आमदार कॅन्टीनमध्ये राडा; संजय गायकवाडांची शिळे अन्न दिल्याने कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, विधान परिषदेत पडसाद

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे ‘आमदार निवास’मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आमदार कॅन्टीनमध्ये राडा; संजय गायकवाडांची शिळे अन्न दिल्याने कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, विधान परिषदेत पडसाद
Published on

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे ‘आमदार निवास’मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिळे जेवण दिल्याने संजय गायकवाड यांनी उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले, यावेळी विरोधी पक्षांनी गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी केली.

मंत्रालयाजवळील ‘आमदार निवास’मधील उपहारगृहात गायकवाड यांनी मंगळवारी रात्री जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ही घटना घडली. “निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, डाळीतून दुर्गंधी तसेच डाळ आणि भात शिळा होता, म्हणून मारहाण केली,” असे गायकवाड यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट त्या कर्मचाऱ्यालाच मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण दिले जात असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या मारहाणीनंतर राजकीय वर्तुळातून आरोप होऊ लागल्यानंतरही त्यांनी आपल्याला या कृत्याचा पश्चाताप झाला नसल्याचे सांगून आपल्या कृतीचे समर्थन केले.

“मंगळवारी रात्री मी नऊ-साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती. त्यात भातासोबत वरण मिक्स करून मी पहिला घास घेताच, मला खराब वाटला. मला वाटले वरणामध्ये चिंच असेल, म्हणून मी पोळीसोबत दुसरा घास घेतला असता, उलटी झाली. त्यामुळे मी वरण तपासले असता, ते पूर्णपणे नासलेले होते,” असे त्यांनी सांगितले.

मारहाणीचे समर्थन करत नाही - शिंदे

संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या असतील तर त्यासाठी कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण हा पर्याय असू शकत नाही. असे करणे योग्य नाही, याची समज मी त्यांना दिली आहे. आम्ही या मारहाणीचे समर्थन करत नाहीत,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले.

गायकवाडांवर कठोर कारवाई करा - सपकाळ

आमदार संजय गायकवाड यांचा हा पहिलाच प्रकार नाही. दादागिरी करणे, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठिशी घालतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून कॅन्टीनचा परवाना निलंबित

कॅन्टीन कर्मचाऱ्याला आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्यानंतर आमदार निवासातील हे कॅन्टीन सरकारच्या रडारवर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी कॅन्टीनवर धाड टाकून अन्नपदार्थांचे नमुने गोळा केले. हे नमुने वांद्रे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याप्रकरणी उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. “याबाबतचा अहवाल येत्या १६ दिवसांत आम्हाला प्राप्त होईल, त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल,” असे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. हे कॅन्टीन गेल्या ३० वर्षांपासून एकाच कंत्राटदारामार्फत चालवले जात असून अनेकदा खाद्यपदार्थांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कारवाईचा निर्णय सभापतींनी घ्यावा - फडणवीस

आकाशवाणी आमदार निवासात असलेल्या उपहारगृहातील कर्मचाऱ्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने मारहाण केल्याचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला. ‘कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा...अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देणार का, अशा आमदारांचे निलंबन करा,’ अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. अशाप्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची, आमदारांची प्रतिष्ठा कमी होते. त्यामुळे सभापतींनी याबाबत काय कारवाई करता येईल, याचा निर्णय घ्यावा.”

logo
marathi.freepressjournal.in