आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या हक्कांचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची केली मागणी

आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या हक्कांचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची केली मागणी
Published on

पुण्यातील हवेली मतदारसंघामधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक २४ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. परंतु या बैठकीवरून राजकारण चांगलंच तापलंय. आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आमसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक तुम्ही पुढे ढकलावी अशी विनंती आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या विनंतीला मान न देता माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक घेतल्याने संजय जगताप आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री यांनी पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेचा अपमान केला आहे. असं करणं लोकप्रतिनिधीच्या अधिकारपदाचा भंग असल्याचं आमदार जगताप म्हणाले.

आमदार संजय जगताप म्हणाले की, "पुरंदरच्या आमसभेच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोयदयांनी विशेष मीटिंग पुरंदर हवेलीच्या विविध विकासकामांच्या बाबतीत लावली होती. त्यासंदर्भामध्ये मी त्यांच्या कार्यालयाशी तसेच पीएससोबत संपर्क केला होता. पत्रव्यवहार केला होता, मेलही केला होता आणि फोनवरूनही त्यांच्या पीएसला सांगितलं होतं. तरीसुद्धा त्यांनी ती मीटिंग घेतली गेली. लोकप्रतिनिधीने आमसभा बोलावली असताना इतर कोणतीही मीटिंग घेता येत नाही. हा माझ्या विशेष अधिकारांचा भंग होतो. त्यामुळं विशेष अधिकारांचा भंग आणि अवमानाची सूचना यासंदर्भात काल मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना समक्ष भेटून याबाबतच्या सूचनेची नोटीस आपण मुख्यमंत्री महोदयांना काढावी, अशी विनंती मी केली आहे आणि त्या प्रकारची नोटीस मी विधानसभा अध्यक्षांना दिलेली आहे."

"मला वाटतंय की पंधरा दिवसांमध्ये याविषयी कारवाई होईल आणि विशेष अधिकारांचा भंगाविषयी जी कमिटी आहे, त्यापुढे त्यांना बोलावलं जाईल, असं मला वाटतंय." असं आमदार जगताप म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in