जेव्हा आमदारच बिबट्या बनून विधानभवनात येतात... शरद सोनवणे यांचे अनोखे आंदोलन; हल्ले रोखण्यासाठी सरकारला केले आवाहन

राज्यात विशेष करून पुणे, जुन्नरमध्ये बिबट्याचे माणसांवर हल्ले वाढले असून त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांचाही बळी जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बुधवारी बिबट्याचे वेश परिधान करून विधान भवन परिसरात प्रवेश केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बिबट्यांच्या हल्ल्यांचे गांभीर्य कळावे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोनवणे यांनी अनोखा मार्ग अवलंबला.
जेव्हा आमदारच बिबट्या बनून विधानभवनात येतात...
जेव्हा आमदारच बिबट्या बनून विधानभवनात येतात...पीटीआय व्हिडिओ स्क्रीनशॉट
Published on

नागपूर : राज्यात विशेष करून पुणे, जुन्नरमध्ये बिबट्याचे माणसांवर हल्ले वाढले असून त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांचाही बळी जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बुधवारी (दि. १०) बिबट्याचे वेश परिधान करून विधान भवन परिसरात प्रवेश केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बिबट्यांच्या हल्ल्यांचे गांभीर्य कळावे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोनवणे यांनी अनोखा मार्ग अवलंबला.

राज्यात बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत असून बिबट्याचे हल्लेही वाढले आहेत. बिबट्या भर वस्तीत शिरून माणसांवर हल्ले करू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतावर जायला शेतकरी घाबरायला लागला आहे. अशाने शेती उद्धस्त होईल, त्यामुळे सरकारने स्वत:च कोर्टाप्रमाणे सुओमोटो याचिकेप्रमाणे यात जातीने लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, सरकारने तत्काळ निर्णय घेऊन रेस्क्यू सेंटरची उभारणी सुरू करावी, ९० दिवसांत राज्यातील प्रत्येक मोकाट बिबट्या पकडून या केंद्रांत हलवावा. मृतांच्या कुटुंबांना २५ लाखांची मदत देण्यापेक्षा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शरद सोनवणे यांनी केले.

राज्यभरात भीतीचे वातावरण

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांमध्ये तर बिबटे थेट वस्तीपर्यंत शिरत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक परिणामग्रस्त क्षेत्रांमध्ये जुन्नर तालुका, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सोलापूर, मराठवाडा तसेच नागपूरचा परिसर आहे.

जुन्नरमध्ये सर्वाधिक बळी

केवळ जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत ५५ नागरिकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सराकार शेतकरी, महिला, मुलांना गुरांच्या गळ्यात बांधतात तसा लोखंडी पट्टा मानेला बांधण्याचा सल्ला देत आहे. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही. आज गावांमध्ये मुलांना अंगणात खेळायला भीती वाटते. शाळेत जाण्यासाठीही मुलांबरोबर घरातले कोणी तरी लागते. काही कुटुंबे तर घराभोवती विद्युत तारेचं कुंपण लावण्याचा विचार करत आहेत. हे उपाय करायचेच असतील तर घर सोडून कुंपणातच राहायला जावे लागेल, असा टोला सोनवणे यांनी लगावला.

नर-मादी बिबट्यांना स्वतंत्र ठेवा

राज्यात मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबवा, तीन महिन्यांच्या आत दोन मोठी रेस्क्यू केंद्रे उभी करावी, एक जुन्नरमध्ये आणि दुसरे अहिल्यानगरमध्ये. या केंद्रांमध्ये किमान दोन हजार बिबट्यांना ठेवता येईल, अशी संरचना करावी. नर आणि मादी बिबट्यांना स्वतंत्र ठेवले तर त्यांच्या प्रजननावर नियंत्रण राहील. बिबट्यांवर मायक्रो मॅनेजमेंटची वेळ आली आहे, असे सोनवणे म्हणाले.

राज्य आपत्ती जाहीर करा

राज्यात बिबट्यांचे हल्ले ही राज्य आपत्ती म्हणून जाहीर करावी. बिबटे आता जंगलात नाहीत, तर उसाच्या शेतात, गावांच्या सीमेवर आणि थेट घरांच्या अंगणात दिसत आहेत. सचिवालयातील वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील खऱ्या समस्यांची कल्पना नाही. बाळांना घराबाहेर ठेवणेही धोकादायक झाले आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in