
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३२ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला, तर विरोधकांना केवळ ५० जागा जिंकता आल्या. विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार उत्तम जानकर हे येत्या २३ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देणार आहेत. माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार उत्तम जानकर दिल्ली येथे २३ जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आमदार उत्तमराव जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करतील.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध होत आहे. माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून पुन्हा मतदान घेतले होते. यावेळी उत्तम जानकर यांना ईव्हीएममध्ये ९६३ मते धानोरे गावात पडली होती, तर हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर त्यांना १२०६ मते पडली. त्यात २४३ मतांचा फरक पडला.
धानोरे आणि मरकडवाडी गावातील हजारो मतदारांनी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे. ते प्रतिज्ञापत्र २३ जानेवारीला निवडणूक आयोगाला देणार आहेत, असे उत्तम जानकर यांनी सांगितले. त्याचवेळी आमदार जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात जर पोटनिवडणूक जाहीर नाही केली तर दिल्ली येथे २५ जानेवारीपासून जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.