
मुंबई : भांडुप, चेंबूर, गोरेगावसह दापोलीतील आमदार माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भांडुप, चेंबूर, गोरेगावसह दापोलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिला आहे.
मागील अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला, मात्र सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केले, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पन्नास खोके नव्हे तर तीन हजार
खोके विकास कामांसाठी दिले, असे शिंदे म्हणाले.
ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाने कोकणात आणि छत्रपती संभाजी नगरात उबाठा गटाला खिंडार पडले. दरम्यान, माजी आमदार संजय कदम यांना शिंदे सेनेच्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहे. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले. मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम कोकणात काम करत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मागील पंचवीस वर्ष कोकणात काम केले. आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. कोकणातील भूमीपूत्रांना तिथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले. शिवसेनेचे दोन कदम एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहणार असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या माजी नगरसेवकांचा सेनाप्रवेश
मुंबईतील भांडुपचे माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उप शाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंना झटका
छत्रपती संभाजी नगर मधील वैजापूर, गंगापूर मतदार संघात आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकाराने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, माजी पंचायच समिती सभापती-राजू मगर, डॉ.राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.