महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRD कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये १० सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. या करारांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी विक्रमी ९६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या (८,७३,६०० कोटी) गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे सुमारे ९.६ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRD कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार
Photo : X (devednra fadanvis)
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये १० सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. या करारांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी विक्रमी ९६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या (८,७३,६०० कोटी) गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे सुमारे ९.६ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.

गेल्या वर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये ४० अब्ज अमेरिकन डॉलरची (३,६०,००० कोटी रुपये) गुंतवणूक झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर यंदा पहिल्याच दिवशी ९६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीचे करार झाले.

या गुंतवणुकीमुळे सुमारे ९.६ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून शाश्वत पायाभूत सुविधा आणि उच्च-तंत्रज्ञानाधारित परिसंस्थांचे केंद्र म्हणून मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) नव्याने ओळख निर्माण होणार आहे.

‘एसबीजी ग्रुप’सोबत ४५ अब्ज डॉलर्सचा (४,०९,५०० कोटी) करार करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशाला लॉजिस्टिक्स, औद्योगिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

एमएमआरडीए आणि ‘एसबीजी ग्रुप’ यांच्या संयुक्त भागीदारीने एमएमआरमधील मोक्याच्या ठिकाणी एकात्मिक लॉजिस्टिक्स, औद्योगिक आणि हायपरस्केल डेटा पार्क्सचे नियोजन, विकास आणि संचालन करण्यात येणार आहे. या भागीदारीत मल्टिमोडल लॉजिस्टिक्स सुविधा, वेअरहाऊसिंग आणि वितरण केंद्रे, ई-कॉमर्स फुलफिलमेंट हब्स, कोल्ड-चेन आणि कृषी-लॉजिस्टिक्स सुविधा, ट्रक टर्मिनल्स, मूल्यवर्धित लॉजिस्टिक्स सेवा, उत्पादन व असेंब्ली सुविधा, हायपरस्केल आणि एज डेटा पार्क्स, डिजिटल पायाभूत सुविधा हब्स तसेच त्यास पूरक स्मार्ट सिस्टीम्स आणि युटिलिटीज यांचा समावेश असेल.

या सहयोगाच्या माध्यमातून येत्या १० वर्षांत अंदाजे ४५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून, त्यातून मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सुमारे ४.५ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.

एमएमआरडीए भूखंड निश्चिती, आवश्यक वैधानिक मंजुरी तसेच ट्रंक (संपूर्ण प्रकल्पाला आधार देणाऱ्या मुख्य पायाभूत सुविधा) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडेल. तर ‘एसबीजी ग्रुप’ गुंतवणूक उभारणीचे नेतृत्व, प्रकल्पांचा विकास आणि दीर्घकालीन व्यवस्थापन करेल. तसेच जागतिक मानकांशी सुसंगतता आणि शाश्वततेच्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन सुनिश्चित करण्यात येईल.

‘पंचशील रियल्टी’ २५ अब्ज डॉलर्सची (₹२,२७,५०० कोटी) गुंतवणूक करणार आहे. या दहा वर्षांच्या कराराअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विकासाच्या रचनेचे रूपांतर व बहुविभागीय विकास धोरण राबवण्यासाठी एमएमआरडीए आणि ‘पंचशील रियल्टी’ सहयोग करणार आहेत.

तसेच ‘के. रहेजा कॉर्प प्रा. लिमिटेड’ १० अब्ज डॉलर्सची (₹९१,००० कोटी) गुंतवणूक करणार आहे. ‘आयआयएसएम ग्लोबल’ ८ अब्ज डॉलर्सची (₹७२,८०० कोटी) गुंतवणूक करेल. या प्रकल्पाअंतर्गत एकात्मिक ‘स्पोर्ट्स सिटी’ विकसित करण्याची संकल्पना असून, पुढील दशकात सुमारे ८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक क्षमता अपेक्षित आहे आणि ८० हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.

‘सुमिटोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट’ ८ अब्ज डॉलर्सची(₹७२,८०० कोटी) गुंतवणूक करणार आहे. दहा वर्षांच्या रोडमॅपअंतर्गत मुंबईच्या शहरी अनुभवाला नवे परिमाण देणारे आणि जागतिक पातळीवरील आर्थिक व व्यावसायिक केंद्र म्हणून असलेले वांद्रे-कुर्ला संकुलाचे स्थान अधिक बळकट करणारे जागतिक दर्जाचे ‘हाय स्ट्रीट डिस्ट्रिक्ट’ विकसित करण्याची संकल्पना आहे. हाय-स्पीड रेल हबसह मल्टिमोडल एकात्मतेवर आधारित विकास ज्यातून भविष्यसाठी सज्ज वाहतूक परिसंस्था सक्षम होईल.

राज्यात १४ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक

दावोस येथे आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीत १४ लाख ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव असून त्यामुळे महाराष्ट्रात १५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हा भारताच्या भविष्याचे ‘पॉवर हाऊस’ ठरणार असून यंदा विक्रमी गुंतवणूक होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉररूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यांचा महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी होकार

ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली अशा कंपन्यांमध्ये कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in