सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची दिलेली मुदत संपली आहे. यानंतर पालिला प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन मनसे आक्रमक झाल्याचं दिसू येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यातील जंगली महाराज रोडवर आज आंदोलन करण्यात आलं. इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोट देखील करण्यात आली. मराठी पाट्यांप्रकरणी संतप्त मनसेकार्यकर्त्यांनी जंगली महाराज रोडवरील चार-पाच दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्या फोडल्या.
मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. यानंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी. याबाबत मनसेकडून पत्र देखील देण्यात आलं होतं. तसंच महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज मनसेकडून आक्रमक होत आंदोलन करण्यात आलं.