"शिक्षकांनी निवडणूक आयोगाचं काम करु नये, कारवाई कोण करतं बघतोच", राज ठाकरे कडाडले

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय. ठाकरेंनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.
"शिक्षकांनी निवडणूक आयोगाचं काम करु नये, कारवाई कोण करतं बघतोच", राज ठाकरे कडाडले
संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगर पालिकेकडून शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात आहेत.त्यामुळे शिक्षण विभागात संतापाची लाट पसरली आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या कामासाठीही शिक्षकांना रुजू करण्यात आलं होतं.याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांनी रुजू होऊ नये. निवडणूक आयोगाने त्यांच्या कामासाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी. शिक्षक गैरहजर असतील,तर या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई कोण करतो, हे मी बघतोच,असा इशारा ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबई शहरात साधारणपणे ४१३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढणार आहेत. शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी गेल्यावर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल.निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं? निवडणुकीच्या तोंडावर आयोग अशाप्रकारचं काम कसं काय करु शकतं? चौथी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार,असे अनेक प्रश्न ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले. या कामांसाठी हजर न होणाऱ्या शिक्षकांवर सरकार शिस्तभंगाची कारवाई करणार आहे, मग निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का करत नाहीत,असा थेट सवाल ठाकरेंनी सरकारला केला आहे. ते पुढे म्हणाले, नेहमी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचा. यात विद्यार्थ्यांचा काय दोष. शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले आहेत. विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकांचं काम आहे.

निवडणुकीची कामं करणे शिक्षकांचं काम नाही. निवडणूक आयोगासोबत मनसेची लवकरच बैठक होईल. शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई कोण करणार, हे मला बघायचं आहे. नव्या लोकांना प्रशिक्षण द्या. निवडणूक आयोग पाच वर्ष काय काम करतं, हे आम्ही आयोगाला विचारणार आहोत.निवडणुकीसाठी तुम्हाला माणसं उपलब्ध करता येत नाहीत का,मला असं वाटतं निवडणूक आयोगावर कारवाई करायला हवी. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामावर रुजू होऊ नये,अस आवाहन करतानाच ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेश बोलवून काहीच होणार नाही.मराठा आरक्षणाचा विषय केंद्राचा आहे.तो राज्याचा नाही.यात तांत्रीत बाबी आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in