लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे समन्वयक जाहीर; अमित ठाकरेंकडे पुण्याची जबाबदारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे समन्वयक जाहीर; अमित ठाकरेंकडे पुण्याची जबाबदारी
Published on

प्रतिनिधी/मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाचे लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयकदेखील जाहीर केले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर दक्षिण मुंबई, संभाजीनगर, जालना, धाराशीव, सांगली या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मनसे नेते आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले. पक्ष निवडणूक लढणार नसला तरी महायुतीला मदत करणार आहे. त्यासाठी आता पक्षाचे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. ही यादी जाहीर करताना संबंधित नेत्यांची माहिती देताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी पक्षाची भूमिका आणि इतर बाबींसाठी समन्वय साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

या यादीनुसार ठाणे, नाशिक, जळगाव मतदारसंघासाठी अभिजित पानसे, पालघर, रत्नागिरी सिंधदुर्ग अविनाश जाधव, भिवंडी/कल्याणसाठी आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, ⁠पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अमित ठाकरे, राजेंद्र वागस्कर आदींकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन सरदेसाई यांच्याकडे मावळ आणि रायगड मतदारसंघाची जबाबादारी देण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांच्याकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय मुंबईतील जबाबदारी

  • दक्षिण मुंबई - बाळा नांदगांवकर, संजय नाईक, सुप्रिया दळवी

  • दक्षिण मध्य मुंबई - नितीन सरदेसाई,

  • संदीप देशपांडे - ⁠उत्तर मध्य मुंबई

  • संजय चित्रे, राजा चौगुले - ⁠उत्तर पश्चिम मुंबई

  • योगेश परुळेकर, शालिनी ठाकरे, संदीप दळवी

  • उत्तर मुंबई - अविनाश अभ्यंकर, नयन कदम, गजानन राणे

  • ⁠उत्तर पूर्व मुंबई - शिरीष सावंत, मनोज चव्हाण, रिटा गुप्ता

logo
marathi.freepressjournal.in