मनसेचा महायुतीला तीन जागांचा प्रस्ताव

गुढीपाडव्याला मनसेचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी वरील माहिती दिली.
मनसेचा महायुतीला तीन जागांचा प्रस्ताव
ANI

मुंबई: महायुतीत सामील होण्यासाठी मनसेने तीन जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यापैकी दोन जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. शिंदेंच्या शिवसेनेत मनसे विलिन होणार, अशा चर्चा सुरू आहेत, त्याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही माहिती नसून याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेच सांगू शकतील, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

गुढीपाडव्याला मनसेचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी वरील माहिती दिली.

या बैठकीत मुंबईतील सर्व मतदारसंघातील विभागअध्यक्षांसह शाखाप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते, सरचिटणीस आणि इतर पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी विभागनिहाय आणि शाखानिहाय बैठका घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय ज्याप्रमाणे मनसेचा पहिला गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदाचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in