मनसेची भूमिका उद्या ठरणार? राज ठाकरेंनी बोलावली बैठक; शहांसोबतची चर्चा सकारात्मक - बाळा नांदगावकर

मनसेला किती जागांची अपेक्षा आहे, हे राज ठाकरे यांनी भेटीत स्पष्ट केले आहे. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येईल...
मनसेची भूमिका उद्या ठरणार? राज ठाकरेंनी बोलावली बैठक; शहांसोबतची चर्चा सकारात्मक - बाळा नांदगावकर
Published on

प्रतिनिधी/मुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मंगळवारी नवी दिल्लीत भेटीदरम्यान झालेली चर्चा अतिशय सकारात्मक होती. मनसेला किती जागांची अपेक्षा आहे, हे राज ठाकरे यांनी भेटीत स्पष्ट केले आहे. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज ठाकरे यांनी गुरुवारी २१ तारखेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीनंतर मनसेची पुढची रणनीती आणखीन स्पष्ट होणार आहे.

दिल्लीवारीनंतर राज ठाकरे मंगळवारी संध्याकाळी मुंबईत परतले. यानंतर त्यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. २१ तारखेला पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची तसेच आगामी गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीची चर्चा होणार आहे. लोकसभेबाबतची मनसेची पुढची रणनीती या बैठकीनंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, दक्षिण मुंबईतून तुमची उमेदवारी निश्चित झाली का, असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारला असता, “दोन वेळा मी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविली आहे. आता जरी राज ठाकरे मला म्हणाले की गडचिरोलीतून लढ, तर त्यालाही माझी तयारी आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला नाही, याचा निर्णय पक्षप्रमुख घेत असतात,” असे बाळा नांदगावकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in