मनसे महायुतीत येणार? नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी घडायला सुरुवात झाली आहे.
मनसे महायुतीत येणार? नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण
(संग्रहित छायाचित्र)
Published on

प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी घडायला सुरुवात झाली आहे. महायुतीत मनसेच्या सहभागाच्या चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या तिघांनी मंगळवारी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची ‘मेघदूत’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीमध्ये मनसेला सामील करून घेण्यासाठी या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत मनसे काही जागांसाठी इच्छुक आहे. लोकसभेसोबतच आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आता मनसे महायुतीत सहभागी होणार का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत तरी ‘एकला चलो रे’ची भूमिका ठेवली होती. दरम्यानच्या काळात त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबतही युतीच्या चर्चा होत्या. पण त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. आता मनसे महायुतीत येणार का, हे पाहावे लागेल. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र अशा चर्चा स्पष्टपणे नाकारल्या आहेत. ही केवळ सदिच्छा भेट होती. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना शिंदे पक्ष असो किंवा भाजप, आमच्यात संवाद सुरू आहे. त्याच अनुषंगाने आम्ही सदिच्छा भेट घेतली असून त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in