

मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या नाशिकमधील खासगी कोचिंग क्लासच्या एका शिक्षकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. येत्या आठ दिवसांत जर अमराठी शिक्षकांना परत पाठवले नाही तर मनसेस्टाईलचा हिसका दाखवला जाईल, असा दमही देण्यात आला.
शहरातील शरणपूर रोड परिसरातील PhysicsWallah या खासगी क्लासमध्ये हा प्रकार घडला. माहितीनुसार, क्लासमधील तीन ते चार विद्यार्थी आपसात मराठीत बोलत होते. त्यावेळी एका शिक्षकाने 'मॅनर्सलेस लोग है, गावठी भाषा में बात करते है' असे म्हणत मराठीचा अपमान केला. एक विद्यार्थी त्याच्या वडिलांशी मराठीत बोलत असताना त्यालाही 'ये कौन सी भाषा है, हिंदी में बात करो' असे सांगण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी तडक नाशिकमधील मनसेचे 'राजगड' कार्यालय गाठले. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते थेट क्लासमध्ये घुसले.
"इथे कमवतो, महाराष्ट्रात पोट भरतो तरी मराठीचा अपमान करतो...मराठीला गावठी बोलतोस लाज नाही वाटत का तुला..." असे म्हणत सदर शिक्षकाला चोप देत मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारला. तसेच, जर येत्या आठ दिवसांत अमराठी शिक्षकांना परत पाठवले नाही तर मनसेस्टाईलचा हिसका दाखवला जाईल, अशी धमकीही देण्यात आली. या क्लासमध्ये बहुतेक शिक्षक परप्रांतीय असून, हिंदी भाषेचा वापर सक्तीने केला जात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासातही अडचणींचा सामना करावा लागतो. पण, लाख-दोन लाख फी भरल्यामुळे विद्यार्थी-पालक काही बोलत नाहीत. विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास प्रतिबंध केला जातो. काही विद्यार्थ्यांना या शिक्षकांचे हिंदी समजत नसल्याने त्याबाबत तक्रार केली असता, शिकायचे असेल तर हिंदीत शिका, अशी अरेरावी केल्याचेही मनसेचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.