मीच परतीचे दोर कापले; मनसेला रामराम केल्यानंतर मोरे झाले व्यक्त

जे लोक पक्षाला पुणे शहरात संपवण्याचा विचार करत असतील, मला त्या लोकांसोबत काम करायचे नाही, त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे, असे वसंत मोरे म्हणाले.
मीच परतीचे दोर कापले; मनसेला रामराम केल्यानंतर मोरे झाले व्यक्त

पुणे : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी प्राथमिक पक्ष सदस्यत्व, सरचिटणीस आणि संघटक पदाचा आज (१२ मार्च) राजीनामा दिला आहे. पुण्यात मनसेचा चेहरा म्हणून वसंत मोरेची ओळख होती. 'मी लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी मनसेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पुणे शहराचा नकारात्मक अहवाल पाठविला आहे', असा आरोप वसंत मोरेंनी आज पत्रकार परिषदेतून केले आहे.

वसंत मोरे म्हणाले, "मी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेत होतो. त्यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत काम केले. मी पुणे शहरातील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता होतो की, राज ठाकरेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मी देखील राजीनामा दिला होता. माझा जो राजकीय प्रवास होता, तो राज ठाकरेंसोबत आहे. मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस, बारामती लोकसभा मतदारसंघाच संघटक या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दीड वर्षापासून मी पुणे शहरात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी सर्व लोकसभा मतदारसंघचा अहवाल मागविला होता. यात पुणे शहरात मनसेची स्थिती अतिशय नाजूक आहे. पुणे शहराबाबत जाणून बुजून नकारात्मक अहवाल पाठविला. मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवू नये", असा गंभीर आरोप वसंत मोरेंनी पुणे शहर पदाधिकाऱ्यावर केला आहे.

मी नेत्यांचे फोन घेतले नाहीत

वसंत मोरेंनी राजनाम्यानंतर भावूक होऊन म्हणाले, "मी एकनिष्ठ राहिलो आहे. पुणे शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील १५ वर्ष घालवली. तेच लोक वसंत मोरेला लोकसभेचे तिकीट मिळून नये म्हणून राज ठाकरेंकडे नकारात्मक अहवाल पाठवित आहेत. मग अशा लोकांसोबत काम करणे मला जमणार नाही. त्यामुळेच मी पक्षाने मला दिलेल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझ्या स्वत:च्या हाताने परतीचे दोर कापले आहे. मला आतापर्यंत संघटनेच्या अनेक लोकाचे फोन आले. मी सामान्य सैनिकांचे फोन घेतले आहेत. पण मी आतापर्यंत कोणत्याही नेत्यांचा फोन घेतला नाही."

मला त्यांच्यासोबत काम करायचेच नाही

राज ठाकरेंच्या हृयात मी माझे स्थान निर्माण केले होते. पण पुणे कोअर कमिटीने त्या स्थानाला धक्का लावण्याचे काम केले, अशा कोअर कमिटीचा मी एक सभासद आहे. मला त्या लोकांसोबत काम करायचे नाही. जी लोक पक्षाला शहरात संपवण्याचा विचार करत असतील, मला त्या लोकांसोबत काम करायचे नाही त्यामुळे आज पक्ष सोडलेला आहे, असेही वसंत मोरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in