राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर मोठा आरोप केला आहे. या व्हिडिओत अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते मिळून मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत असल्यादा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. यावरुन आता राज्य सरकारसह अजित पवार गटावर टीका होताना दिसत आहे.
अजित पवार गटाचे ठाण्यातील नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे वडेट्टीवारांनी म्हटले आहे. "सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे ‘दादा'गिरी करतात आणि कारवाई होत नाही", असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत एका मध्यमवयीन व्यक्तीला चार जण बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्यक्तीला मारताना ते बॅनर फाडण्याबाबत विचारणा करत माफीही मागायला सांगत आहेत. तो व्यक्ती देखील आपणच बॅनर फाडल्याचे सांगतो. पण तो माफी काही मागत नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, तसेच त्यामागची नेमकी सत्यता काय? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.