राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना 'सुपारीबाज' उल्लेख केल्याने मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडल्याचे समजते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली.
'या हल्ल्याला मी भीक घालत नाही. असे मागून हल्ले करुन काही होणार नाही, ते नपूसंक लोक आहेत. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे,', अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
नेमका वाद काय?
राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरपरिस्थिची पाहणी करतेवेळी, 'अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली' अशी बोचरी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना, ''दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही. त्यांची विश्वासार्हता आता संपली आहे. त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही. राज ठाकरेंना साधा एनडीआरएफचा फूल फॉर्म माहिती नाही, हा अलीकडच्या राजकारणातला सर्वात मोठा विनोद आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सूर्याला वाकोल्या दाखवण्यासारखं आहे,'', असे मिटकरी म्हणाले होते. यावरुनच आता मनसैनिक मिटकरींविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.