केवळ मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरे यांची घोषणा

मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही हाताखाली काम केले नाही, पुढे कधी करणारही नाही. मनसैनिकांच्या ताकदीवर हे इंजिन चिन्ह कमविले आहे ते कधीच सोडणार नाही. शिवसेना पक्षाचा प्रमुख वा अध्यक्ष होण्याचा विचारही मला कधी शिवला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
केवळ मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरे यांची घोषणा
Published on

मुंबई : येणारी लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. एक तर आपण खड्ड्यात तरी जाऊ किंवा वरती तरी राहू. त्यामुळे आज देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. मात्र, मनसैनिकांनी येत्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला जोमाने लागावे, असे आदेशही यावेळी राज ठाकरे यांनी दिले.

मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही हाताखाली काम केले नाही, पुढे कधी करणारही नाही. मनसैनिकांच्या ताकदीवर हे इंजिन चिन्ह कमविले आहे ते कधीच सोडणार नाही. शिवसेना पक्षाचा प्रमुख वा अध्यक्ष होण्याचा विचारही मला कधी शिवला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत येणार की नाही याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. त्याचा सस्पेन्स कायम होता. शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हा सस्पेन्स तोडला. फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणे झाले, मी त्यांना सांगितले, मला वाटाघाटी नकोत, राज्यसभाही नको, विधानपरिषदही नको, पण या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मला कोणतीही अपेक्षा नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मी मनसेचाच प्रमुख राहणार

दरम्यानच्या काळात राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यांचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, अरे शिवसेनाप्रमुख व्हायचे असते तर तेव्हाच झालो नसतो काय? बाहेर पडणार होतो तेव्हा माझ्या घरी ३२ आमदार, सहा सात खासदार येऊन म्हणत होते, एकत्रच बाहेर पडू. त्यांना वाटले मी काँग्रेसमध्ये जाईन, कारण त्यावेळी सत्ता काँग्रेसची होती. मी स्पष्टच सांगितले, मला पक्ष फोडून कोणतीच गोष्ट करायची नाही. मी स्वत:चा राजकीय पक्ष काढेन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातले आहे, त्याच मनसेचा मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर हा पक्ष निर्माण केला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

सत्ता गेली म्हणून उद्धव ठाकरेंकडून टीका

आज उद्धव ठाकरे-संजय राऊत ज्या प्रकारे मोदींवर टीका करतात, तशी माझी टीका नव्हती. मला मुख्यमंत्रीपद नको होते. भूमिका पटली नाही तेव्हा टीका केली. आज हे विरोधात बोलतात. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा राजीनामा देत सोबत का आले नाहीत. तेव्हा सत्तेचा मलिदा मिळत होता. आज पक्ष फुटला, सत्ता गेली म्हणून विरोधात बोलत आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

देशातील तरुणांचे मोदींनी भले करावे

२००६ साली मनसे स्थापन केल्यानंतर पहिले भाषण मी केले तेव्हा म्हटले होते, माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जिन्स घातलेला बघायचा आहे. आज जगात सगळ्यात तरुण देश हा भारत आहे. सर्वाधिक तरुण भारतात आहेत. माझी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे की या भारतातील तरुणांकडे लक्ष द्या, हेच देशाचे भविष्य आहे. सहा लाख उद्योगपती देश सोडून गेलेत ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्र जितका कर केंद्राला देतो, त्यातील मोठा वाटा महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याला विरोधच

ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्यांचे स्वागत, ज्या पटत नाहीत त्यांचा मी विरोधच करणार. मी महाराष्ट्रावर, मराठी माणसावर टोकाचे प्रेम करतो. एखाद्यावर विश्वास टाकला तर टोकाचे प्रेम करतो. पण नाही झाले तर टोकाचा विरोध करतो. ‘लाव रे तो व्हिडीओ’ने टोकाचा विरोध केला. पण नंतर चांगल्या गोष्टी घडल्या. ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर पहिले अभिनंदन करणारा मीच होतो. जी गोष्ट योग्य ती योग्यच, असे राज ठाकरे म्हणाले.

विधानसभेला तर हे कोथळे काढतील!

आजच राजकारणात हाणामाऱ्या सुरू आहेत. विधानसभेला तर हे कोथळे बाहेर काढतील. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कोणाच्या सोंगट्या कोणत्या भोकात तेच कळत नाही. आपण योग्य मार्ग या महाराष्ट्राला दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे त्याला जर राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in