मोदी सरकार केवळ उद्योगपतीधार्जिणे! राहुल गांधींचे टीकास्त्र; ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारी महाराष्ट्रात नंदुरबार येथे दाखल झाली. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथे त्यांची जाहीरसभा झाली.
मोदी सरकार केवळ उद्योगपतीधार्जिणे! राहुल गांधींचे टीकास्त्र; ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात दाखल

विशेष प्रतिनिधी/मुंबई

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारी महाराष्ट्रात नंदुरबार येथे दाखल झाली. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथे त्यांची जाहीरसभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे मोदी सरकारने या देशातील उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले, पण आदिवासींना एक रुपयांचाही दिलासा त्यांनी दिला नाही, हे सरकार केवळ उद्योगपतींचा विचार करते, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

नंदुरबारमध्ये कॉंग्रेसला धक्का

दरम्यान, शहादा येथील कॉंग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. उद्या ते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवाजी पार्कवरील सभेला शरद पवार उपस्थित राहणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने येत्या १७ मार्चला दादरच्या शिवाजी पार्कवर होत असलेल्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. यात्रेच्या निमित्ताने इंडिया आघाडीने मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण दिले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना इंडिया आघाडीच्या सभेचे निमंत्रण दिले. शरद पवार यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in