पंढरपूर पालखी मार्गांचा विकास मोदी सरकार करणार

३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली
पंढरपूर पालखी मार्गांचा विकास मोदी सरकार करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर सभेला संबोधित करताना पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी सरकार ११०० कोटींचा खर्च करेल. या माध्यमातून ३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली.

पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम २ टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षाभूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.देहूत येणे हे माझे भाग्य! देहू हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ आहे. अशा या देहूच्या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक’, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे ,मारुतीबाबा कुरहेकर, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.

तुकोबांच्या शिकवणीनुसारच आमचे धोरण

संत तुकाराम यांची शिळा केवळ शिळा नसून ती भक्तीची प्रेरणा आहे. या शिळेवर स्वत: तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. तुकाराम महाराज यांच्या गाथांचे रक्षण करणारे सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांनाही मी नमन करतो. तुकाराम महाराज गरीब, श्रीमंत असा भेद मानत नव्हते. तसा भेदभाव करणे मोठे पाप असल्याचे तुकाराम महाराज म्हणत. सरकारदेखील तुकाराम महाराजांच्या याच शिकवणीनुसार ‘सबका साथ, सबका विश्वास’ या धोरणाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.भारत ही संताची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम संतांनी सदैव केले आहे. भारतीय संस्कृती टिकवून ठेवत ती पुढे नेण्याचे काम संतांनी केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत तुकाराम महाराजांनी त्याग करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या अभंगानी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. सांस्कृतिक मूल्य आधारित त्यांच्या अभंगांनी समाजाला ऊर्जा दिली, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

मोदी हे आपले वारकरी - फडणवीस

तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. ‘तुकोबांच्या जे का रंजले गांजले’, या धर्मानुसारच पंतप्रधान चालत आहेत. पंतप्रधान आपले वारकरी आहेत. वारकऱ्यांत सारेच सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधानसेवक आहेत. संपूर्ण जग आपले आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. तेच मानून संपूर्ण जगाला लस पोहोचवण्याचे काम मोदीजींनी केले, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in