मोदींनी पुण्यातून लोकसभा लढवावी ;संजय काकडे यांचे पंतप्रधानांना पत्र

राज्याचे आणि पुण्याचे भाग्य उजळेल, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे
मोदींनी पुण्यातून लोकसभा लढवावी ;संजय काकडे यांचे पंतप्रधानांना पत्र

पुणे : एकीकडे देशात एक देश एक निवडणुकीची चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचीही लगबग सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजपने काँग्रेसमधूनच आलेल्या आदिती सिंह यांना रायबरेलीतून निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी भाजपसह इतर पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. एनडीएसह इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातून लोकसभा लढवावी, यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते संजय काकडे यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. याबाबत संजय काकडे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर इतिहासात झाला नसेल इतका प्रचंड विजय आम्ही मिळवून देऊ. सर्व विरोधकांचे डिपॉझिट आम्ही जप्त करू, असा दावा देखील संजय काकडे यांनी केला आहे. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसी मतदारसंघातून खासदार आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देखील ते आपल्या मतदारसंघासाठी वेळ काढतात. त्यामुळे वाराणसी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मोदींनी गुजरात आणि उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली तेव्हा, भाजपला त्या राज्यांमध्ये ९० ते १०० टक्के यश मिळाले होते. मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर राज्यातील सर्वच्या सर्व ४८ खासदार भाजपचे निवडून येतील. राज्याचे आणि पुण्याचे भाग्य उजळेल, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसकडून मीच लढणार -धंगेकर

पुणे लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आधीच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असतील, तर आपण त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in