"मोदीजी, विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच सुरु करा..." उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधानांना ओपन चॅलेंज

जर तुम्ही षंढ नसाल, तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न वापरता, धनुष्यबाण चिन्ह न घेता, शिवसेनेचं नाव न लावता माझ्यासमोर लढून दाखवा, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
"मोदीजी, विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच सुरु करा..." उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
Published on

मुंबई: शिवसेना ठाकरे गटानं आज पक्षाचा ५८ वा वर्धापनदिन साजरा केला. षण्मुखानंद सभागृहात यानिमित्तानं मोठा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षानं सर्व नवनिर्वाचित खासदारांचा त्याचबरोबर पराभूत आमदारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांना स्पर्श केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलं. मोदीजी, तुम्ही विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच करा, असं खुलं आव्हान ठाकरेंनी मोदींना दिलं

मोदीजी मी तुम्हाला आव्हान देतोय....

उद्धव ठाकरे म्हणाले की, "जर तुम्ही षंढ नसाल, तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न वापरता, धनुष्यबाण चिन्ह न घेता, शिवसेनेचं नाव न लावता माझ्यासमोर लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरू नका. मला अभिमान आहे की, यावेळी आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचा फोटो वापरला नाही आणि यापुढं देखील वापरणार नाही. मोदीजी मी तुम्हाला आव्हान देतोय. विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच महाराष्ट्रात सुरु करा. फक्त या षंढांना बाजूला ठेवा. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचं, धनुष्यबाण लावायचं नाही. नवं नाव घ्या. मिंध्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. माझ्या वडिलांचा फोटो लावून स्टाईकरेट सांगताय तुम्ही..."

मोदी आणि शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं...

हिंदुत्वावरून ठाकरेंनी मोदी-शहांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "आमच्यावर आरोप केला जातो. शिवसेनेला मराठी मतं पडली नाहीत. हिंदू मतं पडली नाहीत. मुस्लिम मतं पडली. हो पडलीत. सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला पडली आहेत. त्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सारेच आले. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, का तर आम्ही काँग्रेससोबत गेलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे. तुम्ही २०१४, २०१९ चा एनडीएचा फोटो पाहा आणि २०२४ चा पाहा. आज त्यांच्यासोबत जे चंद्राबाबू आणि नितीश कुमार बसलेत, ते हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला आश्वासनं दिलीच आहेत. आमच्याकडे चोरीमारी नाहीये. मुस्लिम समाजाला माहितीये, आम्ही वार केले तर समोरून करू, यांच्यासारखे पाठीमागून नाही."

बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंना टोला-

बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की,"एक गोष्ट बरी झाली. या निवडणूकीमुळं आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालं. काही जणांना फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट ना? आम्ही नाटकं करणारी माणसं नाही. ती कला मोदींना जमते, आम्हाला नाही. महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यात नाही, दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती. रोज यांचे सालटी काढली असतं मी."

logo
marathi.freepressjournal.in