
नागपूर : स्वतःच्या इच्छेने कोणी धर्मांतर करत असेल तर कोणताही आक्षेप नसावा. मात्र, आमिष दाखवून, जबरदस्तीने किंवा फसवून धर्मांतर होऊ नये. जर जबरदस्तीने धर्मांतर झाले असेल तर ते लोक आपल्या अगोदरच्या धर्मात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. आम्ही कोणत्याही पंथाच्या विरोधात नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्गाचे (द्वितीय) आयोजन केले होते. यावेळी समारोप समारंभातील भाषणावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाची संरक्षण क्षमता आणि समाज एकजूट असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरूच
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतरही समस्या संपलेली नाही आणि संकट कायम आहे. अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युद्धाचे प्रकार बदलत आहेत. या निमित्ताने जगातील इतर देशांचीही परीक्षा होत आहे. सत्यासोबत कोण उभे आहे आणि कोण स्वार्थी आहे, हे देखील कळतंय, याचीही परीक्षा झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या संरक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे लागेल, असे मोहन भागवत म्हणाले.