
दीपक गायकवाड/ मोखाडा
किनिस्ते ग्रामपंचायतमधील योगिता सचिन पुजारी या मातेने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता एका सदृढ बालकाला जन्म दिला. जन्मावेळी बालकाचे वजन ३ किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यानंतर सायंकाळी त्या बालकाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्यानंतर जव्हार येथील कुटीर रुग्णालय येथे त्या बालकाला हलविण्यात आले होते. मात्र येथे सुद्धा अतिदक्षता विभागाची सुविधा किंवा त्या बालकाला वाचवू शकेल अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने अखेर त्याला नाशिक येथे हलविण्यात आले होते. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहचण्याआधीच त्या बालकाला मृत घोषित केल्याचे पालकांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
मोखाडा तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर आले असून दोन महिन्यांपूर्वीच एका मातामृत्यूने हादरलेल्या मोखाडा तालुक्यात पुन्हा बालमृत्यू झाल्याचे समोर आले असून तालुक्यातील आरोग्य व्यवस्था आणि दररोज नुसत्या होणाऱ्या घोषणा
यामुळे सरकारची अनास्था समोर आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका मातेला जीव वाचवण्यासाठी मोखाडाहून जव्हार आणि तिथून नाशिक असा १०० किमीचा प्रवास करावा लागला होता मात्र तरीही तिचा जीव वाचला नव्हता. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून आता मात्र एका बालकावर अतिदक्षता विभागाअभावी केवळ जीव वाचवण्यासाठी पुन्हा १०० किमीचा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली होती मात्र असे करूनही त्या चिमुकल्याचे प्राण वाचविण्यास अपयश आल्याने बालकाच्या पालकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
योगीता पुजारी या गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागण्याचे तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रसूती सुखरूप झाली. बाळ सुदृढ असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र सायंकाळच्या दरम्यान त्या बालकाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आल्याने त्याला जव्हार येथे उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर पुढील उपचार होणार नसल्याचे सांगत त्या बालकाला नाशिक येथे हलविण्यात आले. यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहचले खरे मात्र काही मिनिटांतच बालकाला मृत घोषित करण्यात आले, मात्र नाशिकपर्यंत बाळ रडत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
जर मातेची प्रसूती सुखरूप झाली बालक वजनाने सदृढ होते तर बालकाचा मृत्यू झाला कसा? सकाळी ११ वाजता जन्मलेल्या बालकाचा मृत्यू रात्री १२ वाजता झाला तर या १२ ते १३ तासांच्या वेळेत त्याला दुसरीकडे उपचार घेणे शक्य असताना देखील त्याबाबत प्रयत्न का नाही केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात मोखाडा तालुक्यात कुपोषण बाल, मातामृत्य या घटना वाढत असताना आजही कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध न होणे, बालरोग तज्ज्ञांची कमतरता, माता किंवा बालके यांच्यासाठी अतिदक्षता विभाग उपलब्ध नसणे असे गंभीर चित्र आजही कायम आहे.
यामुळे जव्हार मोखाडा तालुक्यातील नागरिकांना आजही उपचारासाठी नाशिक किंवा वापीचा पर्याय निवडावा लागतो.
आमच्या बाळाने सुखरूप जन्म घेतल्याने आम्ही सगळे खुश होतो. संध्याकाळी अचानक बाळाची तब्येत खराब होत असल्याचे सांगून जव्हार येथे हलवले. तिथे चार-पाच तास ठेवून नाशिकला हलवले. नाशिक येथे डॉक्टर घेऊन गेले आणि पाच मिनिटांत आम्हाला सांगितले की बाळ गेले आहे. तिथे पोहचेपर्यंत बाळ रडत होते,३ किलो वजनाचे बाळ असून सुद्धा काही तासांत त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो याबाबत आमच्या मनात प्रश्न आहेत. तसेच पाठवलेल्या रुग्णवाहिकेत डॉक्टर सुद्धा नव्हते. यामुळे याची चौकशी व्हायला हवी.
- सचिन पुजारी, मृत बालकाचे वडील