सहा महिन्यांपासून मोखाडा डेंग्यूच्या विळख्यात

मोखाडा तालुक्यात २०२४ या नववर्षाची सुरुवात डेंग्यूच्या साथीने झाली आहे. प्रत्येक महिण्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूला अटकाव करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने, नागरिक हवालदिल झाले आहेत.
सहा महिन्यांपासून मोखाडा डेंग्यूच्या विळख्यात
Published on

दीपक गायकवाड/ मोखाडा

मोखाडा तालुक्यात २०२४ या नववर्षाची सुरुवात डेंग्यूच्या साथीने झाली आहे. प्रत्येक महिण्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूला अटकाव करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने, नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकारी अहवालावरून जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तालुक्यात डेंग्यूचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मोखाडा ग्रामीण रूग्णालयात जुन आणि जुलैच्या पंधरवाड्यात ३ असे एकूण २७ रुग्ण आढळून आले आहेत, तर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा दुपटीनेही अधिक आहे. त्यामुळे गेली सहा महिन्यांपासून मोखाडा तालुका डेंग्यूच्या विळख्यात आहे.

स्वच्छ भारत मिशन योजनेचा बोजवारा उडालेल्या मोखाडा तालुक्यात डेंग्यूच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जानेवारी महिन्यांपासून मोखाड्यात प्रत्येक महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्यात आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची रक्त चाचणी करण्यात आली आहे. उघडी गटारे, तुंबलेले पाणीसाठा, गावापाड्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे प्रत्येक महिन्यांत तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, त्यांनी डेंग्यूला अटकाव करण्यासाठी ऊपाययोजना सुरू केल्या आहेत.

डेंग्यूला आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच कोरडा दिवस पाळणे, जनजागृती करणे, संशयित रुग्णांची तपासणी करून योग्य तो औषधोपचार करण्यात येत आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी, स्थलांतरित होऊन आलेल्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे.

- डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी

खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी

तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एका ग्रामीण रुग्णालयात थंडी, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. या व्यतिरिक्त खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी जास्त दिसून येते आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात १५ हजार ९२ डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामध्ये २४ रुग्ण डेंग्यूने बाधित असल्याचे समोर आले आहे. तसेच दीड महिन्यात मोखाडा ग्रामीण रुग्णालयात ३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती अधिकच भयानक आहे. येथील आकडेवारी याहूनही दुपटीने अधिक असून, ती माहिती गुलदस्त्यातच आहे. जून महिन्यात ४ रुग्ण चिकुनगुनियाचे आढळले आहेत. सुदैवाने रुग्ण दगावण्याची एकही घटना तालुक्यात घडलेली नाही.

डेंग्यूचा प्रतिबंध

घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वास्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात अशी ठिकाणे नष्ट करावीत. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

logo
marathi.freepressjournal.in