कोयनेत मान्सून सक्रीय ; पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

सध्या कोयना धरणात १०.७५ टीएमसी म्हणजेच १०.२१ टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली
File Photo
File Photo
Published on

कोयनेच्या परिसरात मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात ही मान्सूनने जोर धरला असून कराडसह कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली सुरवात केली आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी मशागती व पेरणीच्या कामात गुंतला आहे. मात्र, तरीही आषाढी वारीसाठी अनेक भाविक पंढरपूरच्या वाटेवर असल्याने एकादशी व बेंदरा नंतरच शेतीच्या कामाला गती येणार आहे.

रविवारी दिवसभर कोयना, नवजासह महाबळेश्वर येथे पावसाचा जोर कमी होता. तरीही रात्री ८ वाजेपर्यंत कोयना येथे २८ मिलिमीटर, नवजा येथे ३२ तर महाबळेश्वर येथे ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, सध्या कोयना धरणात १०.७५ टीएमसी म्हणजेच १०.२१ टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान कराड शहर व परिसरात पावसाने सकाळ पासून हजेरी लावली. मात्र दुपार नंतर पाऊस थांबला होता. दुपार नंतर ढगाळ वातावरण होते. मात्र तालुक्यात आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. आज दिवसभरात कराडसह महाबळेश्वर, पाचगणी, जावळी,वाई ,सातारा आदी तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in