मान्सूनच्या विलंबाने द्राक्षपंढरी चिंतेत; निफाडमधील रोपवाटिका व्यावसायिक अडचणीत

जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असतानाही मान्सूनने अद्याप हजेरी लावलेली नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचा फटका द्राक्षपंढरीतील द्राक्ष रोपवाटिका व्यवसायालाही बसत आहे.
मान्सूनच्या विलंबाने द्राक्षपंढरी चिंतेत; निफाडमधील रोपवाटिका व्यावसायिक अडचणीत
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

हारून शेख/लासलगाव

जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असतानाही मान्सूनने अद्याप हजेरी लावलेली नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचा फटका द्राक्षपंढरीतील द्राक्ष रोपवाटिका व्यवसायालाही बसत असून लाखो द्राक्ष हुंड्यांसाठी पिशव्या मातीने भरून तयार ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, आवश्यक असलेल्या रूटस्टॉकची पुरेशी वाढ न झाल्याने ते वेळेत उपलब्ध होणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात असून नवीन द्राक्ष लागवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दरवर्षी निफाड तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष हुंडी उत्पादन केले जाते. सुरुवातीला डॉगरीज (Dogridge) रूटस्टॉकची लागवड केली जाते. त्याची योग्य वाढ झाल्यानंतर त्यावर विविध वाणांचे ग्राफ्टिंग करण्यात येते. यासाठी पावशेर, तीन किलो आणि पाच किलो क्षमतेच्या पिशव्यांमध्ये रोपे तयार केली जातात. सध्या रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पिशव्या भरून तयार ठेवण्यात आल्या असल्या, तरी पावसाअभावी रूटस्टॉकची वाढ मंदावल्याने पुढील प्रक्रिया अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्ष बागांचे आयुष्य पूर्ण होणे, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान आणि नवीन क्षेत्रवाढ यामुळे दरवर्षी द्राक्ष हुंड्यांना मोठी मागणी असते. काही शेतकरी पाच वर्षे, तर काही दहा वर्षांपर्यंत बागा टिकवून ठेवतात. नवीन लागवडीसाठी हुंड्यांची आवश्यकता भासत असल्याने पाऊस लांबल्यामुळे रोपवाटिका व्यावसायिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत.

सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मात्र, पाऊस लांबल्याने स्ट्रॉबेरी, भात, नागली आणि वरईच्या लागवडीस विलंब होत आहे. या पिकांची वेळेत पेरणी आणि लागवड न झाल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. आधीच महागडी बियाणे, खतांचे वाढलेले दर आणि मशागतीवरील वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरी, भात आणि नागलीच्या लागवडी रखडल्या. वेळेत पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आगामी काळातही समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांचे पीक नियोजन आणि आर्थिक गणित दोन्ही कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोठा आर्थिक फटका बसू शकतो

दरवर्षी ५० लाखांहून अधिक हुंड्यांची लागवड केली जाते. साध्या पावशेर हुंडीमागे तीन ते चार रुपये उत्पादन खर्च येतो. यामध्ये माती, पिशव्या, मजुरी, पाणी, औषध फवारणी आणि निगा यांचा समावेश असतो. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसर द्राक्ष रोपवाटिकांसाठी राज्यातील महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. लाखो रुपयांची गुंतवणूक आधीच झाली असून रूटस्टॉक उपलब्ध न झाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो, अशी चिंता द्राक्ष हुंडी व्यावसायिक गणेश गायकवाड यांनी व्यक्त केली.

द्राक्ष हुंडीचे सध्याचे दर

  • पावशेर हुंडी : ५ ते १० रुपये

  • ३ किलो हुंडी : १० ते १५ रुपये

  • ५ किलो हुंडी : १५ ते २५ रुपये

logo
marathi.freepressjournal.in