विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता २७ जूनपासून

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधरच्या एकूण चार मतदारसंघांसाठी २६ जूनला होणारी निवडणूक तसेच २५ जून रोजी होऊ घातलेली राज्यसभेची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता २७ जूनपासून

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधरच्या एकूण चार मतदारसंघांसाठी २६ जूनला होणारी निवडणूक तसेच २५ जून रोजी होऊ घातलेली राज्यसभेची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर आता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पार पडले होते. या अधिवेशनात सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर सन २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जून २०२४ पासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता राज्यसभेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक आणि त्यानंतर २६ जूनला विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुका लक्षात घेऊन विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ‘सह्याद्री’ या शासकीय अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मंत्री उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in