राज्यात मान्सून सुखसरी कोसळल्या; पुण्यात कहर, रायगड, पुणे, रत्नागिरीत मुसळधार

पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील विविध शहरांना पहिल्याच पावसाने सुखावले.
weather update
weather updateAnand Chaini/FPJ

पुणे/रत्नागिरी : पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील विविध शहरांना पहिल्याच पावसाने सुखावले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी कोकणचा आणखी काही भाग व्यापत पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईसह आणखी काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पुणे शहर व परिसराला शनिवारी पावसाने अक्षरश: झोपडून काढले. तासभर जोरदार बॅटिंग करणाऱ्या या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

मान्सूनची पश्चिम शाखा अधिक सक्रिय असून, शनिवारी मध्य अरबी समुद्र, रत्नागिरीचा आणखी काही भाग, पुणे जिल्ह्यातील बारामतीपर्यंत त्याने मजल मारली. तसेच तेलंगणा, दक्षिण छत्तीसगढ, दक्षिण ओरिसा, आंध्रचा बराचसा भाग मान्सूनने व्यापला आहे. पश्चिमी वारे बळकट होऊन अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प जमिनीकडे येत आहे. याबरोबरच दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत हवेचा ट्रफ पसरल्याने मान्सूनला गती मिळाली आहे. हर्णे, बारामती, निझमाबाद, सुकमा, मलकानगिरी, इस्लामपूर अशी मान्सूनची रेषा आहे.

वाहने गेली वाहून

पुणे शहर व परिसरात झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटनांची नोंद झाली. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही भागात वाहने वाहून जाण्याचेही प्रकार घडले. ४ जूनला पडलेल्या पावसातही पुण्यातील काही भागात वाहने वाहून गेली होती.

कल्याणीनगर, शिवाजी नगर, पाषाण, हडपसर, येरवडा, वडगाव-शेरी, विमाननगर भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. सोसायट्यांमधील पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोकणात मुंबई-गोवा महामार्गाला धोका

संगमेश्वरजवळच्या धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास मुंबई-गोवा हा महामार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून संततधार मुसळधार पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खुश झाला असून पेरणीच्या कामाला जोमाने व उत्साहात करण्यात गुंतला आहे.

ग्रामीण भागातील शेत मळे शेतकऱ्यांच्या लगबगीमुळे फुलून गेले असून कातळ शेतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. खेडमध्ये खाडीपट्ट्यात धोधो पाऊस पडत असून पहिल्याच पावसाच्या दणक्याने डांबरीकरण झालेले रस्ते उखडले गेले. खेड बहिरोली रस्ता हा गुहागर, चिपळूण, रत्नागिरीला जोडला जातो हा रस्ता उखडला गेला असल्याने जागोजागी रस्त्यांवर पावसाचे पाणी साठलेले दिसत आहे. भरपावसातही खडी डांबर टाकून मलमपट्टी केली जात असल्याचे दिसत आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

कशेडी घाटात अवजड वाहनांना बंदी

मुसळधार पावसामुळे खेड-चिपळूण मार्ग उखडण्यास सुरुवात झाली आहे, तर कशेडी बोगदा अवजड वाहनास बंद करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यालाही पावसाने तुफान झोडपले. शनिवारी दुपारपासून संगमेश्वर, देवरूख परिसरात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने तेथील शेतकरीवर्ग सुखावला आहे. आरवली व धामणी या संगमेश्वरमधील रस्ता उखडला असून वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे. आता तर तो भाग धोकादायक ठरू लागला आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

रत्नागिरीलाही पावसाने शुक्रवारपासून झोडपण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सिमेंटच्या रस्त्याची कामे भरपावसात कशाचीही पर्वा न करता युद्धपातळीवर सुरू आहे. एकेरी रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू ठेवल्याने नागरिकांना रस्त्याने छत्री घेऊन जायला अवघड बनले असल्याने छोट्या वाहनांचे किरकोळ अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार भरचिखलात सुरू होता. खरेदीसाठी भरपावसातही नागरिकांची झुंबड होती. मुंबई-गोवा रस्ता बऱ्याच ठिकाणी डबक्यासारखा बनला आहे, तर रत्नागिरी साखरपा कोल्हापूर, नागपूर महामार्ग वाहतुकीला अवघड बनला आहे.

पावसाळा सु‌रू होताच चिपळूण महसूल खात्याने हमरस्त्यावरील परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा दिल्या, परंतु ऐन पावसाळ्यात मिळालेल्या नोटिसा स्वीकारल्या गेल्या नाहीत. हमरस्त्यावरील ३ किलोमीटर लांबीच्या परशुराम घाटातील डोंगर कटाईमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पेढे व माथ्यावरील परशुराम गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी भराव कोसळल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता.

रायगडच्या महाडमध्ये पावसाची हजेरी

महाड, पोलादपूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी गोवामार्गे कोकणात मान्सून दाखल झाला होता. ६ जूनलाच रायगड जिल्ह्यात पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पावसाने वातावरणातील उष्म्याचे प्रमाण आणखी वाढले होते. शनिवारी बराच वेळ महाड, पोलादपूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. या परिसरात शनिवारी जोरदार पाऊस पडल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

सिंधुदुर्गला ‘रेड अलर्ट’ : रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसणार आहे. जोरदार वारेही वाहतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात शनिवारी मोसमी पावसाने प्रवेश केला. या पहिल्या पावसाचे पुण्याला चांगला तडाखा दिला. पुण्यातील पर्वती, डेक्कन, पाषाण तसेच अन्य भागात जोरदार पावसाने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले. वीर बाजी पासलकर पूल पाण्याखाली गेला. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अवघ्या तासाभरात बेफाम पाऊस झाल्याने काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळाले. तसेच शहरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याचे दिसून आले. साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ६७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

मान्सूनचे राज्यात आगमन झाले असून सर्वत्र मान्सूनसरी कोसळत आहेत. राज्यात पावसाची तीव्रता वाढली असून, काही भागांत ऑरेंज अलर्ट, तर बहुतांश भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट पुढील तीन दिवस देण्यात आला आहे. यावेळी जोरदार वारेही वाहतील. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

दोन दिवसांत मोसमी पाऊस मुंबईत

मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, दोन दिवसांत तो मुंबईसह महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापेल, असे हवामान विभागाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in