कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून दाखल'; शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

राज्यातील नागरिक ज्याची वाट पाहत होते तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरपर्यंत गुरुवारी धडक मारली.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून दाखल'; शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

पुणे : राज्यातील नागरिक ज्याची वाट पाहत होते तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरपर्यंत गुरुवारी धडक मारली. दरम्यान, शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

यंदा नियोजित वेळेआधीच मान्सून अंदमान बेटावर दाखल झाला, तर केरळात ३० मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे महाराष्ट्रातही तो ७ जूनपूर्वी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोसमी पावसाने मजल मारली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाने गुरुवारी रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूरपर्यंत मजल मारली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती असून, पुढील तीन दिवसांत पाऊस मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंत धडक देण्याचा अंदाज आहे.

गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील मोसमी पावसाची शाखा वेगाने पुढे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, मुंबई आणि पश्चिम घाटाच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.

तळकोकणात एक दिवस अगोदर आगमन

मोसमी पाऊस सरासरी ५ जून रोजी गोव्यात आणि सात जून रोजी तळकोकणात दाखल होतो. यंदा एक दिवस अगोदरच पाऊस तळकोकणात दाखल झाला आहे. पुण्यात सरासरी दहा आणि मुंबईत अकरा जून रोजी पाऊस दाखल होतो. यंदा पुणे आणि मुंबईतही नियोजित वेळेपूर्वीच मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. हवामान विभागानेही कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in