

पुणे/मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार कोसळल्यानंतर पाऊस येत्या सात दिवसांसाठी रजेवर गेला आहे. येते सहा ते सात दिवस पावसासाठी वातावरण पोषक नाही, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पाऊस गायब होताच हवेतील उष्माही वाढला असून ऐन जुलैमध्ये भयंकर उकाडा जाणवत आहे.
राज्याच्या विविध भागात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने नागरिकांसह शेतकरीही हैराण झाले आहेत. कारण पेरणी केलेली असतानाच पाऊस गायब झाला. येते सात दिवस अत्यंत तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी भारतात ५.० मिमी पावसाची नोंद झाली, जी ९.५ मिमी या सरासरीच्या तुलनेत ४७% कमी आहे. या हंगामातील पावसाची तूट कमी झाली तरी या कालावधीतील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे. १ जून ते ११ जुलै दरम्यान देशात २१७.२ मिमी पाऊस झाला, जो या कालावधीतील २५७.८ मिमी या सरासरीपेक्षा १६% कमी आहे.
हवामान खात्याने सांगितले की, मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्याने संपूर्ण देश व्यापला होता. तथापि, तेव्हापासून अनेक भागांतील पावसाचा जोर ओसरला असून, देशातील हवामानाच्या विविध प्रणाल्या कमकुवत झाल्यामुळे आगामी दिवसांतही पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे.
देशातील चार समान हवामान क्षेत्रांपैकी केवळ पूर्व आणि ईशान्य भारतात शनिवारी १३.७ मिमी या 'सामान्य' पावसाची नोंद झाली. उत्तर-पश्चिम भारतात पाऊस 'तुटीचा' राहिला, जिथे तो सरासरीपेक्षा २३% कमी झाला. मध्य भारत आणि दक्षिण भारतात पावसाची 'मोठी तूट' दिसून आली, जिथे अनुक्रमे १.७ मिमी आणि २.५ मिमी पावसाची नोंद झाली.
१८ उपविभागांत मोठी तूट
देशातील ३६ उपविभागांपैकी दोन उपविभागांत 'मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त', चार उपविभागांत 'अतिरिक्त' पाऊस झाला. मात्र १८ उपविभागांत 'मोठी तूट' आणि सात उपविभागांत 'तूट' जाणवली. तीन उपविभागांत 'सामान्य' पाऊस झाला. दोन उपविभागांत अजिबात पाऊस झाला नाही, असे हवामान विभागाने सांगितले.