

संजय करडे/मुरूड-जंजिरा
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर धडकलेल्या 'मोंथा' चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या राहिल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ लिमिटेडच्या वतीने मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना तातडीच्या आर्थिक मदतीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मनोहर बैले, संचालक धनंजय देशमुख, सचिव राजेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाच्या सततच्या इशाऱ्यांमुळे मच्छिमार बांधवांना समुद्रात उतरणे शक्य झाले नाही. पारंपरिक मच्छिमारांची वाळत घातलेली मासळी भिजून खराब झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या वर्षी ७ मेपासून सुरू झालेले वादळी वारे आजपर्यंत थांबलेले नाहीत. जवळपास सहा महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही. सर्व बोटी बंदरावर नांगर टाकून उभ्या आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यामुळे मच्छिमारांनाही आता कर्ज, अनुदान, विमा संरक्षण आणि विविध कृषी योजनांचा लाभमिळेल. मात्र सध्याच्या संकटात शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी मच्छिमार संघटनांनी केली आहे.
महाराष्ट्राचा ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आणि कोकण किनारपट्टी मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. लाखो कुटुंबे थेट या व्यवसायावर अवलंबून आहेत. वादळ, पाऊस, आणि समुद्रबंदीने आमची उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही, तर हजारो कुटुंबे उपासमारीकडे ढकलली जातील. कृषीप्रमाणे मत्स्यव्यवसायालाही तातडीची मदत मिळाली, तरच मच्छीमार पुन्हा समुद्रात उभे राहतील.
मनोहर बैले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र
मच्छिमार कृती समिती २७ हजार कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, जिल्ह्यात तब्बल २,१३० सहा-सिलेंडर बोटी आहेत. प्रत्येक बोटीवर सुमारे १२ खलाशी आणि नाखवे काम करतात. म्हणजेच सुमारे २७,६९० कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, मात्र यंदा पावसाने सर्व काही हिरावून घेतले आहे.