मोरा- भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट महागणार

मोरा- भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट महागणार

मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात  गुरूवार २६ मेपासून पावसाळी हंगामासाठी १५ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ होणार असल्याने सागरी प्रवास ९० रुपयांवरुन १०५ रुपयांपर्यंत महागणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात भरमसाठ वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात ७५ रुपयांवरुन ९० रुपयांपर्यंत अशी १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीटदरात ९० रुपयांवरुन थेट १०५ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफ तिकिट दरातही वाढ करण्यात येणार आहे. ही पावसाळी हंगामासाठी तिकीट दरवाढ २६ मेपासून लागू करण्यात येणार असली तरी तिकिट दरवाढीची मंजुरी मेरिटाईम बोर्डाकडून २०२१ मध्येच घेण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी.वी. पवार यांनी दिली. मोरा-भाऊचा धक्का हा सागरी मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत फायदेशीर, सुखद आणि शार्टकट म्हणून ओळखला जातो. वाहतूक कोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस  या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते. त्यामुळे मांडवा-अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते.

मात्र दरवर्षी हंगाम पावसाळी असो उन्हाळी तिकीट दरवाढ प्रवाशांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मात्र तिकीट दरवाढीनंतरही प्रवाशांच्या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. उलट प्रवाशांच्या नशिबात गळक्या प्रवासी बोटी आणि समस्यांचाच  अधिक सामना करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in