बुलढाणा: हरिनाम सप्ताहातील प्रसाद खाल्याने ४०० जणांना विषबाधा, दोरीला सलाईनच्या बाटल्या लटकवून रस्त्यावरच उपचार

रुग्णालयात जागा अपूरी असल्याने अनेक रुग्णांना रस्त्यावरच तेही चक्क दोरीला सलाईन लटकवून उपचार करण्याची वेळ आली.
Buldhana Patients
Buldhana Patients

बुलढाणा : जिल्ह्यातील लोणार तालुक्यात खापरखेड, सोमठाणा येथील मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात एकादशीच्या दिवशी ४०० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भगर, आमटीच्या प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले होते. या प्रसादाचं सेवन केल्यावर भाविकांची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात जागा अपूरी असल्याने अनेक रुग्णांना रस्त्यावरच तेही चक्क दोरीला सलाईन लटकवून उपचार करण्याची वेळ आली. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ही दुर्देवी घटना मंगळवारी २० फेब्रुवारीला रात्री घडली. रुग्णांना पुढील उपचारासाठी बिबी, लोणार आणि मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमाठणे येथील भगवान नाडे यांच्या शेतात असलेल्या मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १४ फेब्रुवारीपासून या सप्ताहाला सुरुवात झाली होती. एकादशीच्या दिवशी भगर, आमटीचा प्रसाद भाविकांना देण्यात आला.

परंतु, या प्रसादाच्या सेवनामुळे सोमठाणा आणि खापरखेड येथील काही महिला आणि पुरुषांची प्रकृती बिघडली. या लोकांना त्रास होऊ लागल्याने बिबी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात सराव करणाऱ्या डॉक्टरांना तातडीनं बोलावण्यात आले. दरम्यान, विषबाधा झालेल्या १०२ जणांवर बीबी आणि लोणार ग्रामिण रूग्णालय येथे उपचार करण्यात आले.

रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर वयोवृद्धांची विशेष काळजी घेतली जात आहे. बीबी येथे १४२, मेहकर येथे ३५ आणि लोणार ग्रामिण रुग्णालयात १५ असे एकूण १९२ नागरिकांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांना तपास करण्यासाठी आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in