
नागपूर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, लाँग विकेंड साजरा करण्याच्या निमित्ताने समृद्धी महामार्गावरून निघालेल्या कारचालकांना मोठा फटका बसला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर कार आणि मालवाहू ट्रकसह ५० हून अधिक वाहने रस्त्यावर लोखंडी फलकामुळे पंक्चर झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि वनोजा टोलनाक्यादरम्यान सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आणि अनेक वाहने रात्रभर अडकून पडली. हायस्पीड कनेक्टिव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सहा पदरी समृद्धी महामार्गावर पंक्चरमुळे मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली. अडकलेल्या प्रवाशांनी तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने तसेच मदतीअभावी निराशा व्यक्त केली.
स्थानिक प्रशासनाकडून मदत पोहोचण्यास बराच विलंब होत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोखंडी पत्र्याचा तुकडा चुकून पडला की जाणूनबुजून फेकला गेला, याचा तपास सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महामार्ग प्रशासनाने दिले आहे.
महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित
मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या ७०१ किलोमीटर लांबीच्या या समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, ही घटना घडली आहे. जून महिन्यात जालना जिल्ह्यात दोन कारच्या धडकेत सहा जण ठार, तर चार जखमी झाले होते. या घटनेमुळे प्रवाशांनी महामार्ग प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अशा घटना घडल्या आहेत, जिथे खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले आहे.