
पुणे : जुळ्या मुलांची नीट वाढ होत नसल्याने जन्मदात्या आईनेच मुलांना संपवल्याची घटना पुण्यात घडली आहे. लोणी काळभोर परिसरात राहणाऱ्या आईने दोन्ही चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आईने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला, पण कुटुंबीयांच्या प्रसंगावधानाने महिलेला वाचवण्यात यश आले. याप्रकरणी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मूळ सांगली जिल्ह्यातील आष्टा, मिरजवाडी येथील एका महिलेने टेस्ट ट्यूब बेबीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला होता. दत्तनगर येथे माहेरी राहणाऱ्या या महिलेने मुलांची वाढ नीट होत नसल्याने तसेच आर्थिक खर्च आणि वाढत्या तणावामुळे मुलांना संपवण्याचा प्रयत्न केला. तिने दोन्ही मुलांना मंगळवारी सकाळी घराच्या छतावर नेत पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांना ठार केले. यानंतर उडी मारून स्वत:देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.