अजित पवारांच्या पाटीवर आईचे नाव; महिला धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली.
अजित पवारांच्या पाटीवर आईचे नाव; महिला धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी
(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी/मुंबई

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने  जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासकीय  अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरु केली असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी सोमवारी झळकली.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. सोमवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली. राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल, कृतीशील उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

८  मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली.  शुक्रवारपासून   सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज  मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची  ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली होती.

logo
marathi.freepressjournal.in