Nepal Bus Accident: नेपाळमधील अपघाताने वरणगाव परिसरात शोककळा

शुक्रवारी सकाळी नेपाळ सहलीला गेलेल्या वरणगाव येथील भाविकांची एक बस नदीत कोसळल्याची आणि त्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येताच जळगाव जिल्हा हादरला.
Nepal Bus Accident: नेपाळमधील अपघाताने वरणगाव परिसरात शोककळा
PTI
Published on

जळगाव : शुक्रवारी सकाळी नेपाळ सहलीला गेलेल्या वरणगाव येथील भाविकांची एक बस नदीत कोसळल्याची आणि त्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येताच जळगाव जिल्हा हादरला. भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल परिसरावर शोककळा पसरली असून शुक्रवारी आणि शनिवारी या परिसरात चुली पेटल्या नाहीत, दुकाने बंद होती. या अपघातात वरणगाव येथील दोन कुटुंबांतील प्रत्येकी चार जण मृत्यू पावले आहेत.

वरणगाव तळवेल परिसरातील ११० भाविक तळवेल येथील एका टूर कंपनीसोबत उत्तर प्रदेश, नेपाळला देवदर्शनासाठी गेले होते. प्रथम अयोध्येला रामकथा ऐकून व काशीदर्शन करून हे सर्वजण गोरखपूरहून नेपाळला रवाना झाले होते. शुक्रवारी सकाळी अनेकांनी आपल्या घरी प्रवास मजेत चालला असल्याचे सांगत काठमांडूला जात असल्याचे सांगितले, असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बस नदीत कोसळल्याची माहिती देणारा फोन दुसऱ्या बसमध्ये असलेल्यांनी घरी केला आणि वरणगाव तळवेल परिसर सुन्न झाला. नेपाळहून येणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर सगळेजण लक्ष ठेवून होते. तीन बसमध्ये हे भाविक विभागले गेल्याने नेमके कोण अपघातात गेले हे कळू शकत नव्हते. वरणगाव येथील जावळे आणि सरोदे कुटुंबातील प्रत्येकी चार जण या अपघातात मृत्युमुखी पडले असल्याने त्यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी होऊन शोकाकूल वातावरण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तळवेल व वरणगावला भेट घेऊन नेपाळला गेलेल्या भाविकांची माहिती घेतली. रक्षा खडसे यांनी तेथूनच पीएम हाऊसची परवानगी घेऊन नेपाळला रवाना झाल्या. भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे हे या भाविकांसोबत गेले होते. जळगावला येताच हा अपघात झाल्याचे त्यांना कळताच ते हादरले आणि गेलेल्यांना मदतीसाठी ते परत नेपाळला रवाना झाले.

पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख

नेपाळमध्ये अपघातात मरण पावलेल्या जळगावच्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in