महायुतीचे जागावाटप आज ठरणार? मनसेही भाजपच्या छावणीत : फडणवीसांसह राज ठाकरेही दिल्ली दरबारी

महायुतीत मनसेलाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, राज ठाकरे दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाले आहेत. आता ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी रात्री उशिरा चर्चा करणार आहेत. मनसे महायुतीत आल्यास हा फॅक्टर महायुतीसाठी गेमचेंजर ठरू शकतो.
महायुतीचे जागावाटप आज ठरणार? मनसेही भाजपच्या छावणीत : फडणवीसांसह राज ठाकरेही दिल्ली दरबारी

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राज्यातील सत्ताधारी महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनेक जागांवरून अजूनही महायुतीत वाद आहे. त्यामुळे हे त्रांगडे मिटवण्यासाठी आता राजधानी दिल्लीत खलबते सुरू झाली असून, २४ तासांत महायुतीचे जागावाटप निश्चित होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, महायुतीत मनसेलाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, राज ठाकरे दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाले आहेत. आता ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी रात्री उशिरा चर्चा करणार आहेत. मनसे महायुतीत आल्यास हा फॅक्टर महायुतीसाठी गेमचेंजर ठरू शकतो.

महाविकास आघाडीची मुंबईत कोंडी करण्याच्या दृष्टीने महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे ठाकरे गटाची शिवसेना खिळखिळी केली. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडत अजित पवारांना सोबतीला घेतले. त्यातच आता मुंबईत आणखी ताकद वाढविण्याच्या दृष्टीने मनसेलाही सोबत घेण्याचे महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक भेट घेऊन त्यावर चर्चाही केली. परंतु, आतापर्यंत राज ठाकरे यांनी तसे संकेत दिले नव्हते. मात्र, आता राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीत आणखी एक भिडू मनसेच्या रूपाने सामील होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

याअगोदर भाजप नेते आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांनी राज ठाकरे यांना दिल्लीचा मेसेज दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणुका जाहीर होण्याअगोदर मनसेने स्वबळाचीच भाषा केली होती. परंतु, मागच्या आठवड्यापासून मनसेने वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून, ४ दिवसांपूर्वी राज ठाकरे राजधानी दिल्लीत गेले होते. आता पुन्हा आज ते दिल्लीत दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत राज ठाकरे यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोलणी होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

एकीकडे राज ठाकरे दिल्लीत दाखल झालेले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल झालेले आहेत, तर राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रात्री उशिरा ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत नवी दिल्लीत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या मनसेला दक्षिण मुंबईची जागा दिली जाऊ शकते. तेथे मनसे नेते बाळा नांदगावकर मैदानात उतरू शकतात, असे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे बुधवारी उमेदवार घोषित करणार?

महायुतीचे जागावाटप २४ तासांत जाहीर होण्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बुधवारी आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते, असे संकेत देण्यात आले आहेत. शिंदे गटाचे जवळपास सर्वच विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाच ही उमेदवारी मिळू शकते. परंतु, शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेल्या किती जागा भाजपला सोडाव्या लागतात, हे उमेदवार घोषित केल्यानंतरच स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in