शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी आज

महादेव जानकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, होळीच्या दिवशी जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली.
शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी आज

मुंबई : जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याचे सांगतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या १५ ते १६ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत नसली तरी आम्ही जिंकणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत यावे असाच आमचा प्रयत्न होता. ते आमच्याबरोबर आले तर महाविकास आघाडीचा विजय अधिक देदीप्यमान झाला असता, असेही राऊत म्हणाले.

वंचितची भूमिका आपण २६ मार्च रोजी जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. वंचितची पहिली उमेदवार यादी देखील कदाचित जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारले असता, प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत. ते आमच्यासोबत असावेत हा आमचा प्रयत्न आहे आणि आजही आहे.

आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. ज्या जागा त्यांनी मागितल्या होत्या, त्याच जागा त्यांना दिल्या होत्या. आता तो प्रस्ताव स्वीकारायचा किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ते सदैव आमच्यासोबत असावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. महाविकास आघाडीत चार ते पाच पक्ष सहभागी आहेत. सर्वांना जागावाटपात हिस्सा मिळायला हवा. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या पाठीशी जनमत आणि लोकमत आहे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, महादेव जानकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, होळीच्या दिवशी जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे जानकर आता महायुतीमधून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले. त्यासंदर्भात राऊत म्हणाले, जानकर यांना कोणतीच विचारधारा नाही. जेथे खायला मिळेल तेथेच ते जाणार, हे लोक असेच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

वंचितची भूमिका आज स्पष्ट होणार

वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी होण्यासंदर्भातील वाटाघाटी आता संपल्यात जमा आहेत. वंचित महाविकास आघाडीपासून फारकत घेऊन लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचितची पुढील भूमिका मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्पष्ट करणार आहेत. यावेळी ते वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अडीच तास या दोघांमध्ये चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. भाजप तसेच काँग्रेसच्या काही उमेदवारांच्या याद्या जाहीरही झाल्या आहेत. वंचितचे प्रकाश आंबेडकर हे आघाडीतून जवळपास बाहेर पडल्यातच जमा आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोघांमध्ये या बदलत्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in