खा. शरद पवारांच्या पठ्ठ्याने भेदला ‘सह्याद्री’चा चक्रव्यूह!

संपूर्ण सहकार क्षेत्राचे व पश्चिम महाराष्ट्रात औत्सुकतेचा विषय बनलेल्या कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने रविवारी दणदणीत विजय मिळवला.
खा. शरद पवारांच्या पठ्ठ्याने भेदला ‘सह्याद्री’चा चक्रव्यूह!
Published on

संपूर्ण सहकार क्षेत्राचे व पश्चिम महाराष्ट्रात औत्सुकतेचा विषय बनलेल्या कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने रविवारी दणदणीत विजय मिळवत केवळस्वार्थासाठी एकत्र आलेल्या विरोधकांचा पुरता सुफडासाफ तर केलाच पण एक हाती सत्ताही कायम ठेवली.

रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीवरून सत्ताधारी गटाला निर्णायक मताधिक्क्यांची आघाडी मिळाली असून रात्री उशिरापर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होऊन अधिकृत निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी विरोधी दोन्ही पॅनेलला सुमारे ४ हजारहून अधिकच्या मतांच्या फरकांनी पराभावास सामोरे जावे लागले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने २१ / ० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला धक्का बसला आहे तर विरोधातील तिसरे पॅनेल सत्ताधाऱ्यांसमोर निष्क्रीय ठरले आहे.

देशाचे ज्येष्ठ दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून व स्व. पी.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या कराडच्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच तिरंगी झाली. कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांठी तिन्ही पॅनेलचे ६१ उमेदवार व अपक्ष ९ असे ७० उमेदवार निवडणूक रिंगणात शड्डू ठोकून उभे होते. यासाठी शनिवारी मतदान होऊन रविवारी मतमोजणी पार पडली. यामुळे सुरुवातीपासूनच मोठी चुरस पहायला मिळाली. केंद्रासह राज्यात असलेली सत्ता व सत्ताधाऱ्यांच्या होत असलेल्या पडद्यामागील हालचालीमुळे आमदार मनोज घोरपडे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. ४ ते ५ हजार मतांच्या फरकांनी पॅनेल निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी जाहीर सभांमधून व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात सभासद मतदारांनी त्यांना धूळ चारत त्यांच्या पॅनेलचा सुफडसाफ केला.शेतकरी सभासद बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

९९ मतदान केंद्रांवर पार पडली निवडणूक

सह्याद्री कारखान्याचे कराड, सातारा, कोरेगाव, खटाव,खानापूर व कडेगाव अशा दोन जिल्ह्यातील सहा तालुक्यात कार्यक्षेत्र असून ३२२०५ शेतकरी कारखान्याचे सभासद मतदार आहेत. यापैकी २६०८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सहा गट व तीन आरक्षित प्रवर्गातून एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी ९९ मतदान केंद्रांवर मतपत्रिकेद्वारे शनिवारी मतदान झाले. रविवारी पहिल्या फेरीत १ ते ५० केंद्रावरील मतांची मोजणी करण्यात आली तर दुसऱ्या फेरीत ५१ ते ९९ मतदान केंद्रावरील मते मोजण्यात आली.

४ हजार मतांची आघाडी कायम

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत एक ते पन्नास मतदान केंद्रांची मतमोजणी दुपारी दोनच्या सुमारास पूर्ण झाली. त्यात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल सुमारे ४ हजार मतांनी आघाडीवर राहिले, अशीच आघाडी कायम राखत विजय मिळवला.

पहिल्यांदाच तिरंगी लढत

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी माजी सहकार मंत्री तथा विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या तीन पॅनेलमध्ये थेट लढत झाली. मात्र सह्याद्री कारखान्याच्या इतिहासात तब्बल २५ वर्षांनंतर निवडणूक झाली तर पाहिल्यांदाच तिरंगी लढत झाली आहे.त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्यापुढे विरोधकांनी मोठी चुरस निर्माण केली होती.

logo
marathi.freepressjournal.in