"गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!", श्रीकांत शिंदेंचा 'तो' फोटो ट्विट करत राऊतांचा हल्लाबोल : फडणवीसांना म्हणाले...

"मा. गृहमंत्री देवेन्द्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस..."
"गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!", श्रीकांत शिंदेंचा 'तो' फोटो ट्विट करत राऊतांचा हल्लाबोल : फडणवीसांना म्हणाले...
Published on

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एका व्यक्तीने भेट घेतल्यावरुन नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. काल खासदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकर याने वर्षा निवासस्थानी जाऊन शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे-

या फोटोचा दाखला देत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट केले आहे. "मा. गृहमंत्री देवेन्द्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!", असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोण आहे हेमंत दाभेकर?

किशोर मारणे खून प्रकरणी हेमंत दाभेकर हा गुंड शरद मोहळ सोबत होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर आहे. तो शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा होता. असे असताना आता दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो समोर आल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. या भेटीचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली होती. कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतेवेळी पार्थ यांनी मारेणेच्या घरी भेट दिली होती. यावेळी पार्थ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. या भेटीवरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर अजित पवार यांनी, पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in