‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय
पुणे/प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर २५ ऑगस्टला होणारी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला आहे. त्याचबरोबर कृषी विभागाच्या २५८ जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले. या दोन मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, संयुक्त पूर्वपरीक्षेच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या पंधरा हजार जागा भरण्याची तिसरी मागणी काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार, रूपाली पाटील आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
‘आयबीपीएस’ परीक्षा आणि ‘एमपीएससी’ची राज्य सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी आपल्या इतर मागण्यांवर ठाम होते. परीक्षा पुढे ढकलल्यानंतरही ते आंदोलनाला बसले होते. मात्र, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत काही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, काही जण अद्याप आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
संयुक्त पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून पंधरा हजार जागा भरण्याच्या तिसऱ्या मागणीबाबत येत्या सात दिवसांत शरद पवार हे मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील, असे आश्वासन रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि या तिसऱ्या मागणीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार, अभिमन्यू पवार यांचे प्रतिनिधी आणि रूपाली पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित पवार म्हणाले, हे तुमचे आंदोलन आहे, पुढे न्यायचे हा तुमचा विषय आहे, उद्या मी मुख्यमंत्र्याची भेट घेतो, सरकारने परीक्षेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आयोगासमोर मी आंदोलनाला बसायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
काही विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय
जोपर्यंत तिसऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतला आहे