ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पासून; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, MPSC च्या लाखो उमेदवारांना मिळाला दिलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा संगणक आधारित अर्थात ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाविरोधात उमेदवारांमध्ये असलेली तीव्र नाराजी लक्षात घेऊन ऑनलाइन परीक्षा प्रणाली ऑगस्ट २०२७ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला दिले आहेत.
ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पासून; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, MPSC च्या लाखो उमेदवारांना मिळाला दिलासा
ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पासून; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, MPSC च्या लाखो उमेदवारांना मिळाला दिलासा
Published on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा संगणक आधारित अर्थात ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाविरोधात उमेदवारांमध्ये असलेली तीव्र नाराजी लक्षात घेऊन ऑनलाइन परीक्षा प्रणाली ऑगस्ट २०२७ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला दिले आहेत. या निर्णयाने लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

‘एमपीएससी’ने काही दिवसांपूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘क’ ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. ही परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार होती. तसेच प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाणार होती. सर्व सत्रांतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आणि काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षेअंती गुणांचे समानीकरण केले जाणार होते.

‘एमपीएससी’च्या या निर्णयाविरोधात परीक्षार्थी, उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय रद्द करून ती ऑफलाइन घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेतली होती.

या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी फडणवीस म्हणाले की, टप्प्याटप्प्याने या सुधारणा राबवाव्यात. संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात’.

या बैठकीत ‘एमपीएससी’च्या परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, परीक्षांचे वेळापत्रक, निकाल प्रक्रियेतील विलंब कमी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उमेदवारांना सुलभ आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.   

बैठकीला ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in