

पुणे : पुण्यात राज्यभरातून आलेल्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत सोमवारी एक भव्य आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात पुण्याच्या ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याचा समारोप झाला. ‘एमपीएससी’ आयोगाचा ढिसाळ कारभार, सातत्याने होणारी पेपरफुटी आणि कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, सचिव महेंद्र हरपाळकर यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेचे पदाधिकारी नेमावेत अशी मागणी केली.
मोर्चामध्ये आमदार रोहित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजीत कदम, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक विठ्ठल कांगणे, स्पर्धा परीक्षा शिक्षकांचे प्रतिनिधी सचिन ढवळे, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्पक, उपरोधिक फलकांनी लक्ष वेधले
मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले अत्यंत कल्पक, उपरोधिक आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये आम्हाला गुलीगत धोका दिला. ‘हमे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था. हमारी कश्ती वही डुबी, जहा पाणी खमता आणि नो डायपर्स, ओन्ली पेपर्स, अशा घोषणा लिहिलेले पोस्टर्स झळकावून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रहार करत मतदार फोडले, आमदार फोडले अन् आता एमपीएससीचे पेपरही फोडले आणि फोडा झोडा आणि राज्य करा, असे फलक विद्यार्थ्यांच्या हातात दिसत होते. ड्रग इन्सपेक्टरचा पेपर पार्किंगमध्ये फोडल्याचा निषेध करण्यासाठी ‘नो पार्किंग - पार्किंगमध्ये गाड्या पार्क करायच्या असतात, पेपर नाही’, असे टोकदार फलकही या मोर्च्यामध्ये मुख्य आकर्षण ठरले.
नुकताच झालेला ड्रग इन्सपेक्टरचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा ‘एमपीएससी’ आयोगावरील संपूर्ण विश्वास उडाला असून, ऋषिकेश गांगर्डे या विद्यार्थ्याने ही पेपरफुटी धाडसाने उघडकीस आणली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशी व्हावी, चौकशीचा अहवाल तत्काळ समोर यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच, ‘एमपीएससी’वर तुकाराम मुंडे किंवा झगडे साहेबांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि पारदर्शक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, ही प्रमुख मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली.
या आंदोलनाला अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि जाहीर पाठिंबा दर्शवून पाठबळ दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे या सुरुवातीलाच या आंदोलनात सहभागी झाल्या. या संवेदनशील विषयावर राजकारण न करता विरोधक म्हणून आम्ही स्वतः मध्यस्थी करायला तयार आहोत, असे त्या म्हणाल्या.
आमदार रोहित पवार हे काळा शर्ट परिधान करून आणि हातात संविधानाची प्रत घेऊन या आक्रोशात थेट सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर बोलताना रोहित पवारांनी आक्षेप घेतला की, संबंधित अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाही त्यांची आधी नियुक्ती का करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला.
सर्व परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय नेत्यांऐवजी केवळ विद्यार्थी व शिक्षकांच्या शिष्टमंडळानेच चर्चा करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.
‘एमपीएससी’ अध्यक्ष, सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी
परीक्षार्थींनी केलेल्या विविध मागण्यांमध्ये आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष विवेक भीमनवार, सचिव महेंद्र हरपाळकर यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेचे पदाधिकारी नेमावेत, या मुख्य मागणीशिवाय परीक्षेतील आक्षेपांवर ८ दिवसांत स्पष्टीकरण देऊन गैरप्रकाराची चौकशी करावी, राज्यसेवा मुख्य २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी व्हावी, पेपरफुटी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचचा प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अटकेत असलेले आरोपी अपर सचिव अभिजीत लेंडवेच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, आरोपी लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या सेवाकाळाची व पदोन्नती निकषांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी व्हावी, अशा इतर मागण्या आहेत.