

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत ऐतिहासिक बदल करत राज्यातील सर्व पूर्वपरीक्षा टप्प्याटप्प्याने संगणक प्रणालीवर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, सीबीटी) घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘महाराष्ट्र गट-क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ पासून होणार असून, २६१९ पदांसाठी जाहीर झालेली ही परीक्षा सीबीटी पद्धतीनेच घेतली जाणार आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी दिली.
भीमनवार यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेतील सुधारणांमुळे पदांची संख्या चार ते पाच पट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाने आधुनिक, सुरक्षित आणि जलद असलेल्या सीबीटी प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीटी पद्धतीमुळे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, डिजिटल सुरक्षा, उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन आणि निकाल प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. यामुळे प्रत्येक भरती प्रक्रिया त्याच वर्षात पूर्ण करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा झाल्यास उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण केले जाणार असून, त्यासाठी आयआयटी मुंबई तसेच सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक आणि पारदर्शक सूत्र निश्चित करण्यात येणार आहे. याबाबतची स्वतंत्र कार्यपद्धती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयोगाने डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत १३८ संवर्गांच्या परीक्षा सीबीटी पद्धतीने यशस्वीपणे घेतल्या असून, पुढील तीन महिन्यांत आणखी ८१ संवर्गांच्या परीक्षा याच पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे आयोगाला या प्रणालीचा पुरेसा अनुभव असल्याचा दावा भीमनवार यांनी केला.
सन २०२७ पासून महाराष्ट्र नागरी सेवा गट-अ, गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. उमेदवारांनी कोणताही संभ्रम न बाळगता सीबीटी पद्धतीनुसार तयारी सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
येथे घेणार परीक्षा
सीबीटी परीक्षा शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि संगणक प्रयोगशाळांमध्ये घेतल्या जातील. मात्र प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचालन, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहणार आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रांचे सी-डॅक मार्फत सुरक्षा परीक्षण केले जाईल. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट ऑनलाइन दिली जाईल.