

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, निकालातील विसंगती आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आक्रमक आंदोलन करीत एमपीएससीच्या कारभाराविरोधात जोरदार आवाज उठविला.
‘परीक्षा आमच्या भविष्याची, मग निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता का नाही?’ असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा संशयाला वाव राहू नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
एमपीएससीच्या कारभारातील कथित त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण केला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याची भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात प्रा. उत्तम गोरे, शंकर शिंदे, बाळासाहेब शिंदे आणि यादवराव मारकड यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला. आंदोलनात विद्या र्थ्यांनी आपली बाजू मांडत सरकारविरोधात घोषणा केली.
‘आमच्या भविष्याशी खेळू नका !’
एमपीएससीच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अविश्वास निर्माण झाला असून, तो दूर करण्यासाठी आयोगाने पारदर्शक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उमेदवार वर्षानुवर्षे मेहनत घेतात. अनेक विद्यार्थी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अडचणींवर मात करून परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणतीही त्रुटी अथवा गैरप्रकार झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो. कथित पेपरफुटी, निकालातील विसंगती आणि परीक्षा प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची पारदर्शक पद्धतीने चौकशी करून संपूर्ण वस्तुस्थिती विद्यार्थ्यांसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली. चौकशीच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा न करता दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली.
अध्यक्ष-सचिवांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
एमपीएससीच्या सर्वोच्च प्रशासकीय स्तरावरील जबाबदारीचा वस्तुनिष्ठ पुनर्विचार करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सक्षम, निष्पक्ष आणि विश्वासार्ह प्रशासनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. आयोगाच्या कारभाराबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची जबाबदारी निश्चित करावी. आवश्यक असल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबतही निर्णय घ्यावा, अशी भूमिका काही आंदोलनकर्त्यांनी मांडली.
उत्तरपत्रिका तपासणीचीही चौकशी करा !
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ तसेच कृषिसेवा परीक्षेतील वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या तक्रारींचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणीची पद्धत, मॉडरेशन, गुणांकनातील सुसंगती आणि मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया यांची निष्पक्ष पडताळणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. एका गुणामुळेही एखाद्या उमेदवाराचे संपूर्ण भवितव्य बदलू शकते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणांकन प्रक्रियेत कोणतीही शंका किंवा विसंगती राहता कामा नये, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
‘आठ दिवसांत उत्तर द्या !’
गट-ब परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी उपस्थित केलेल्या विविध आक्षेपांवर आठ दिवसांच्या आत अधिकृत आणि सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी थेट मागणी विद्यार्थ्यांनी केली. प्रत्येक आक्षेपाची कारणासहित दखल घेऊन त्याचे पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आवश्यकता भासल्यास स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल विद्यार्थ्यांसमोर जाहीर करावा, अशीही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.