

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी, एनएसयूआयचे पदाधिकारी, विद्यार्थी व परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन एमपीएससी व शासकीय भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत निवेदन दिले.
पेपरफुटी, सीबीटी आणि नॉर्मलायझेशन, परीक्षा पुढे ढकलल्याने निर्माण झालेली वयोमर्यादेची अडचण, प्रलंबित भरती आणि राज्यातील सुमारे २.५ लाख रिक्त पदांचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला. शिष्टमंडळात रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, राज्य संयोजक कॅप्टन अमोल महाडिक, इर्विन डी’मेलो, गिरीश उगले पाटील, राजेंद्र पालांडे, मयूर पाटेकर, मयूर गुंजाळ, एनएसयूआयचे राज्य सरचिटणीस मंगेश दुतोंडे, सौरभ शिंदे व प्रांकेश के. यांच्यासह विविध विभागांतील विद्यार्थी व परीक्षार्थींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यपालांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून आवश्यक कार्यवाहीसाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. धनंजय शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांना आता पारदर्शक परीक्षा, वेळेत भरती आणि न्याय हवा आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.