
नागपूर : राज्यात बऱ्याच जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, अनेकांच्या डोक्यावरील छप्परच नाहीसे झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सरकारची मागणी मान्य करत एमपीएससीची २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबरला होणारा आहे. मात्र अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतरच्या या पहिल्याच परीक्षेवर विघ्न येण्याची शक्यता आहे. राज्यभरातील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. ऐन परीक्षा तोंडावर आली असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने आयोगाला विनंती अर्ज पाठवण्यात आले होते. त्यानुसार आयोगाने परीक्षा पुढे ढकलली असून आता एमपीएससीची परीक्षा २८ सप्टेंबर ऐवजी ९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तर या दिवशी होणाऱ्या अन्न परीक्षांसाठी नवीन शुद्धिपत्रक जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २८ सप्टेंबर, रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५ महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावरील ५२४ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आलेली असून सदर परीक्षेकरीता एकूण १,७५,५१६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. राज्यातील हवामान खात्याने येत्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तसेच राज्यातील जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली असल्याने अनेक जिल्ह्यांमधील विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.