MPSC : आता नवीन परीक्षा पॅटर्न २०२५पासून होणार लागू; एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी

राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५पासून लागू करण्यात यावी अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली होती
MPSC : आता नवीन परीक्षा पॅटर्न २०२५पासून होणार लागू; एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे (MPSC) विद्यार्थी आपल्या मागण्या आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडे मांडत आहेत. असेच आंदोलन आज पुण्यातील अलका चौकामध्ये करण्यात आले होते. यावेळी राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५पासून लागू करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी होती. ही मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

सकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून दिला. त्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. अखेर त्यांच्या आंदोलनाला आज यश आले. यानंतर पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला.

आमदार गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले की, "आज विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या भावना सरकारने ऐकल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत. मात्र या निर्णयामुळे ज्यांना पोटशूळ उठला आहे, त्यांना रडत बसूद्या. त्याला पर्याय नाही."

दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज पुण्यातील अलका चौकशीत जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले होते. याआधीही शास्त्री मार्गावर अहिल्यादेवी शिक्षण मंडळ आणि अलका टॉकीज चौकात आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहत त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावेळी मागण्या न पूर्ण झाल्याने आज जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in