

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील ढिसाळपणा, पेपर फुटी आणि भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून, याविरोधात आता पुण्यातच दिल्लीतील 'जंतरमंतर'सारखे बेमुदत आंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.
राज्य सरकारकडून संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सकाळी १० वाजल्यापासून पुण्यातील नवी पेठ येथील एस. एम. जोशी पुलावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाचा हवाला देत पुकारण्यात आलेल्या या सत्याग्रहामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरण्यात आली आहे.
हे नियोजित आंदोलन सुरुवातीला २७ सप्टेंबर रोजी होणार होते. मात्र, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीमध्ये हे आंदोलन २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला, ज्याला पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आंदोलनाची अधिकृत माहिती देण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कांबळे, प्रमोद पाटील, विश्वजीत जाधव आदींनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले आहे.
दरम्यान, या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही मोठी ताकद दिली असून, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले की, गरज भासल्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेदेखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहतील.
राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे या आंदोलनात फाटाफूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारे विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील यांनी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर थेट प्रश्न उपस्थित करत हे आंदोलन विद्यार्थ्यांचे न राहता राजकीय पक्षांचे होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
३ ऑक्टाेबरची परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ३ ऑक्टोबर २०२६ पासून आयोजित करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२६ यांचा समावेश आहे.